मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज; पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं

मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज; पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं

मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात असणाऱ्या नेव्ही नगरमध्ये नौदलाचे अधिकारी पुराणमल मेहरा (वय 30) यांनी आपली पत्नी व लहान मुलांना विष देऊन संपवल्यानंतर स्वत: गळफास घेतल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. शनिवारी मध्यरात्री राहत्या घरात पुराणमल मेहता, त्यांची पत्नी ओमा, मुलगा यश आणि दोन महिन्यांचे बाळ मृतावस्थेत आढळून आले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पुराणमल मेहरा यांनी स्वत:च्या कुटुंबाला संपवून आत्महत्येसारखे  टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर नौदल आणि कफ परेड पोलिसांनी या प्रकरणाचा संयुक्त तपास सुरु होता. प्राथमिक तपासानंतर नोकरीशी संबंधित ताण किंवा कौटुंबिक कलहामुळे पुराणमल मेहरा यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. 

15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन होता. त्यापूर्वीच पुराणमल मेहरा यांनी 14 ऑगस्टच्या रात्री आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी 14 ऑगस्टच्या रात्री पुराणमल यांनी वडिलांना “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना” असा शेवटचा मेसेज केला होता. सकाळी हा मेसेज त्यांच्या कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर नेव्ही कंट्रोल रूमला माहिती देण्यात आली. त्यानंतर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पुराणमल मेहरा यांच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा पुराणमल गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर पत्नी ओमा आणि दोन मुले मृतावस्थेत आढळली. पुराणमल यांच्यावर मानसिक तणावासाठी उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. घरातील कौटुंबिक वाद आणि पोस्टिंगशी संबंधित तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. कफ परेड पोलिसांकडून तपास सुरू असून चौघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

सध्या नौदल आणि मुंबई पोलीस या घटनेचा पुढील तपास कसून करत आहेत. मृत्यूमागचं नेमकं कारण आणि घटनाक्रम शोधण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर शेजाऱ्यांकडेही चौकशी केली होती. त्यामधून पोलिसांच्या हाती थोडीफार माहिती लागली आहे. मात्र, या चारही मृतदेहांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच आणखी काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतील.