E20 इंधनावरून नागपुरात काँग्रेस आक्रमक; नितीन गडकरींच्या घरावर जनआक्रोश मोर्चा

E20 इंधनावरून नागपुरात काँग्रेस आक्रमक; नितीन गडकरींच्या घरावर जनआक्रोश मोर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : E20 इंधनाच्या मुद्द्यावरून नागपुरात युवक काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानावर युवक काँग्रेसने जनआक्रोश मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी गडकरी यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.

महाल परिसरातील गडकरी वाड्याकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी मध्येच अडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी लावलेले बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करताना पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि E20 इंधनाच्या विरोधात हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. तरीही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते देवडिया भवन, चिटणीस पार्क येथून गडकरी वाड्याकडे निघाले. मात्र, शिवतीर्थ परिसरात पोलिसांनी मोर्चा रोखला.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी E20 इंधनाविरोधात घोषणाबाजी करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी E20 इंधनावर प्रश्न उपस्थित करत वाहनांच्या मायलेजमध्ये घट, इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम, जुन्या वाहनांमध्ये तांत्रिक अडचणी आणि इंधन प्रणालीवरील परिणाम यासंदर्भात ग्राहक आणि मेकॅनिकांकडून तक्रारी येत असल्याचा दावा केला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि नितीन गडकरी यांच्यावर टीका करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.