'उपोषण मागे घेईन, पण सोनम वांगचूक यांच्या सरकारकडे 'या' 3 अटी
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर आमरण उपोषण करणारे सोनम वांगचूक यांना रविवारी दिल्ली पोलिसांनी सफदरगंज रुग्णालयात हलवले. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, काही अटी पूर्ण झाल्यास आपण उपोषण मागे घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.

सोनम वांगचूक यांच्या तीन प्रमुख अटी अशा आहेत:
1. केंद्र सरकारने NEET पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर जबाबदारी स्वीकारावी.
2. मला आणि सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना संसदेत जाण्याची परवानगी द्यावी. तसेच खासदारांनी NEET पेपरफुटीचा मुद्दा संसदेत मांडण्याचे आश्वासन द्यावे.
3. माझ्या प्रकृतीमुळे संसदेत जाणे शक्य नसल्यास, खासदार आणि संबंधित नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात येऊन या मागण्यांबाबत आश्वासन द्यावे.
याशिवाय, रुग्णालयात आपल्याला अनधिकृतपणे ताब्यात ठेवण्यात आले असून हालचाली, संवाद आणि संपर्कावर निर्बंध घालण्यात आल्याचा आरोपही वांगचूक यांनी केला आहे.दरम्यान, वांगचूक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनाची धार कमी होईल, अशी अपेक्षा प्रशासनाची होती. मात्र, अभिजीत दिपके यांनी उपोषण सुरूच ठेवले असून, वांगचूक यांना पोलिसांनी उचलून नेतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंदोलनाला अधिक पाठिंबा मिळताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर जंतरमंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, दंगल नियंत्रण पथक, वॉटर कॅनन आणि इतर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीकडून मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. या मोर्चात ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागाचीही चर्चा आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याने पुढे आंदोलनाची दिशा काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




