नगर महामार्गावर दोन अपघातात दोघा जणांचा मृत्यू

नगर महामार्गावर दोन अपघातात दोघा जणांचा मृत्यू

पुणे (प्रतिनिधी) :नगर महामार्गावर शिक्रापूर व कासारी फाट्याजवळ दोन वेगवेगळ्या दुचाकींना अज्ञात वाहनांनी धडक दिल्याने झालेल्या अपघातात महेश धोंडीराम भगत आणि सचिन वसंत आडे हे दोघे मृत्युमुखी पडले आहेत.

दि.९ रोजी पहाटेच्या सुमारास महेश भगत हे त्यांच्याकडील दुचाकीवरून अहिल्यानगर बाजूने पुण्याच्या दिशेने येत असताना, कासारी फाटा जवळील एका हॉटेलसमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला, ज्यात महेश भगत जखमी झाले. तसेच, याच मार्गावरून सचिन आडे हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना कोंढापुरी येथे पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन आडे गंभीर जखमी झाले.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी दोन्ही अपघातातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी महेश धोंडीराम भगत (वय ४४) सध्या रा. शिक्रापूर ता. शिरूर, मूळ रा. काले ता. जुन्नर) आणि सचिन वसंत आडे (वय ३०) रा. रांजणगाव गणपती, मूळ रा. ईश्वरनगर तांडा ता. उमरी जि. नांदेड यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी पवन रामचंद्र चव्हाण (वय २०) रा. रांजणगाव गणपती, मूळ रा. पळसगाव तांडा ता. उमरी जि. नांदेड आणि प्रवीण शंकर धुमाळ (वय ३९, रा. पिंपळे धुमाळ ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार किशोर तेलंग आणि अतुल पखाले करत आहेत.