अजित पवार मृत्यूप्रकरणाच्या चर्चेला विलंब, विधानपरिषदेत तीव्र पडसाद

अजित पवार मृत्यूप्रकरणाच्या चर्चेला विलंब, विधानपरिषदेत तीव्र पडसाद

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या मृत्यूची चर्चा लांबणीवर पडल्याचे तीव्र पडसाद मंगळवारी विधानपरिषदेत उमटले. ही चर्चा जाणीवपूर्वक टाळली जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी संताप व्यक्त केला. त्यावर सभापती राम शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वेळेनुसार येत्या सोमवारपर्यंत चर्चा घेतली जाईल, अशी ग्वाही दिल्याने हा वाद निवळला.

अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत अनेक शंका उपस्थित होत असून, त्यावर सविस्तर चर्चा घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार) आ. शशिकांत शिंदे यांनी केली होती. मात्र, तीन आठवडे उलटूनही त्यावर चर्चा घेण्यात न आल्याने सभागृहात पुन्हा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

सत्य बाहेर येऊ नये म्हणून चर्चा टाळली जात आहे का? असा सवाल आमदार शिंदे यांनी केला. तर, आमदार अमोल मिटकरी सचिन अहिर यांनीही प्रश्न उपस्थित केले. त्यावर सभापती राम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चा पुढे ढकलावी लागत असून त्यांच्या वेळेनुसार बुधवारी किंवा येत्या सोमवारी यावरील चर्चा घेण्यात येईल.