शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी भाजपची नवी अट? एनडीएमध्ये प्रवेशावर दिल्लीतून स्पष्ट संदेश, सूत्रांचा दावा
मुंबई (प्रतिनिधी) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य सत्ताप्रवेशाबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. मात्र, एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपने एक महत्त्वाची अट घातल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीएसोबत यायचे असेल, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच यावे लागेल, असा संदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटींनंतर शरद पवार गट महायुतीत सहभागी होणार का, याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू झाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच महायुतीत कोणताही नवा पक्ष सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर केंद्र आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनाही उधाण आले आहे. राज्य मंत्रिमंडळात जयंत पाटील यांना महत्त्वाचे खाते मिळू शकते, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे शरद पवार गटाच्या संभाव्य सत्तासहभागाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप स्वतंत्रपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीएमध्ये घेण्यापेक्षा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र येण्याला प्राधान्य देत आहे. दोन्ही गट एकत्र येऊन एनडीएमध्ये सहभागी झाल्यास दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक केंद्रीय मंत्रीपद देण्याबाबत भाजप सकारात्मक असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही.
दरम्यान, महायुतीचे आमदार रवी राणा यांनीही मोठा राजकीय दावा केला आहे. येत्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील आणि सुनेत्रा पवार राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावतील, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, या दाव्यालाही अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
सध्या या सर्व घडामोडी सूत्रांकडून मिळालेल्या माहितींवर आणि राजकीय चर्चांवर आधारित असून, पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी आणि भाजपकडून याबाबत कोणती अधिकृत भूमिका समोर येते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




