"रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला हिंसक वळण; मंत्रालयासमोर सुतळी बॉम्ब फेकत कार्यकर्त्यांचा गोंधळ"
मुंबई (प्रतिनिधी) : सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. तुपकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने आंदोलन अधिक तीव्र होत असून काही ठिकाणी त्याला हिंसक वळण लागल्याचे चित्र दिसत आहे.मुंबईतील मंत्रालयासमोर रविकांत तुपकर यांच्या समर्थकांनी जोरदार आंदोलन छेडले. यावेळी एका कार्यकर्त्याने झाडावर चढून हातात सुतळी बॉम्बची पिशवी घेत आंदोलन सुरू केले. पोलिसांनी त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करताच त्याने सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना घडली. त्यानंतर तो राष्ट्रगीत म्हणू लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना कुलाबा पोलीस ठाण्यात विनाकारण डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे. झटापटीत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांवर तातडीने उपचार करून त्यांची बिनशर्त सुटका करावी, अन्यथा राज्यभरातील शेतकरी मुंबईकडे मोर्चा वळवतील, असा इशाराही त्यांनी दिला.दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि हिवरा आश्रम येथील तलाठी कार्यालयांना आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच जालना-खामगाव मार्गावरील चिखलीजवळील टोल नाक्यालाही आग लावण्यात आल्याची माहिती आहे. सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारालाही अज्ञात व्यक्तींनी ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस सुरू असताना त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारने तातडीने या आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. तुपकर यांच्या आईनेही भावनिक प्रतिक्रिया देत, सरकारने वेळेत निर्णय न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशारा दिला आहे.




