कोल्हापुरात स्त्री भ्रूणहत्येच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, माजी सिव्हिल सर्जनला अटक!

कोल्हापुरात स्त्री भ्रूणहत्येच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, माजी सिव्हिल सर्जनला अटक!

·  कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर पोलिसांनी स्त्री भ्रूणहत्येच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, आरोग्य विभागाच्या ७० वर्षीय माजी जिल्हा शल्यचिकित्सकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी डॉक्टरवर त्याच्या रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात केल्याचा गंभीर आरोप आहे.

प्राथमिक तपासात समोर आले आहे की, या रुग्णालयात ३०० हून अधिक संशयास्पद गर्भपात झाले असण्याची शक्यता आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाची कागदपत्रे, जप्त केलेली वैद्यकीय उपकरणे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे. छाप्यानंतर डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले, मात्र चौकशीदरम्यान त्याला छातीत दुखू लागल्याने कोल्हापूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती सुधारल्यानंतर त्याला औपचारिकपणे अटक करून न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

तपासात असेही उघड झाले आहे की, आरोपी प्रत्येक अवैध गर्भपातासाठी अंदाजे २० हजार रुपये आकारत होता. कोल्हापूरमधील एका लॉजमध्ये चालणाऱ्या अवैध लिंगनिदान रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलीस तिथे पोहोचताच मुख्य आरोपी पळून गेला, पण दोन महिला एजंटांना जागीच अटक करण्यात आली. लिंगनिदान चाचणीत स्त्री गर्भाची पुष्टी झाल्यास त्या महिला गर्भवतींना या डॉक्टरच्या रुग्णालयात पाठवत असत.

संपूर्ण नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी एक सुनियोजित सापळा रचला. एका महिला पोलीस अधिकाऱ्याला नातेवाईक भासवून एका बनावट ग्राहकासह रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे गर्भपाताची औषधे दिली जात होती आणि पुढील प्रक्रियेची तयारी सुरू होती. दरम्यान, मुख्य पोलीस पथक आणि आरोग्य विभागाने छापा टाकत गर्भपाताची औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त केले.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमांशिवाय महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक कायदा, महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायदा आणि PCPNDT कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये माजी जिल्हा शल्यचिकित्सकासह एकूण ७ आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे, या आरोपी डॉक्टरांनी आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी आणि सिव्हिल सर्जनसारख्या महत्त्वाच्या पदांवर दीर्घकाळ काम केले आहे. तपास यंत्रणा आता या संपूर्ण नेटवर्कचा सखोल शोध घेत आहेत.