अमित शाहांचं भाषण पूर्ण ऐकलं असतं तर थोबाडं काळी झाली असती; फडणवीसांचा विरोधकांना टोला

अमित शाहांचं भाषण पूर्ण ऐकलं असतं तर थोबाडं काळी झाली असती; फडणवीसांचा विरोधकांना टोला

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेसंबंधी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका होत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाहांचं भाषण विरोधकांनी पूर्ण ऐकलं असतं, तर अशी टीका झालीच नसती. अमित शाह काय बोलले हे पूर्ण ऐकलं असतं, तर यांची थोबाडं काळी झाली असती, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

 नवी मुंबईत झालेल्या राजभाषा संमेलनात अमित शाह यांनी हिंदीच्या विरोधकांवर भाष्य केलं होतं. महाराष्ट्र ही सर्वात मोठी बहुभाषिक भूमी असल्याचं त्यांनी म्हटलं. मातृभाषेसोबत दुसरी राष्ट्रीय भाषा शिकण्याला विरोध करणारे पाप करत आहेत, असंही अमित शाह म्हणाले. यानंतर ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट करत अप्रत्यक्षपणे अमित शाह यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा आहे.

 यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं, तर अशी टीका झाली नसती. महाराष्ट्रात मराठीच कशी योग्य आहे, हे अमित शाहांनी सांगितलं. मातृभाषेचं महत्त्वही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील लोक बहुभाषिक आहेत, याचा अर्थ माझी मातृभाषा बदलणार असा होत नाही. सिलेक्टिव्ह ऐकायचं आणि त्यावर टीका करायची, हे योग्य नाही. अमित शाह काय बोलले ते पूर्ण ऐकलं असतं, तर यांची थोबाडं काळी झाली असती, असं फडणवीस म्हणाले.

 दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर मोजक्या शब्दांत पोस्ट केली आहे. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच...’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी संमेलन पार पडलं. या संमेलनात महाराष्ट्र बहुभाषिक असल्याचं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या पोस्टचा रोख अमित शाह यांच्या वक्तव्याकडे आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

 दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पुन्हा अर्ज करण्यात आला असून, त्यावर मेरिटवर निर्णय घेतला जाईल. मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सव हा मोठा सण असतो. या काळात कायदा आणि सुव्यवस्था महत्त्वाची आहे. मनोज जरांगे यांच्या अनेक मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत, तर काही प्रश्न न्यायालयात आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने नव्याने एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांचंही नाव असल्याचं सांगितलं जात आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणासंदर्भातील एफआयआर मी पाहिलेली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. त्यामुळे त्यावर आपण तर्कवितर्क करणं योग्य नाही.