कंगना रणौतच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा संताप; पत्रकारांशी बोलताना केली जोरदार टीका
मुंबई (प्रतिनिधी) : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिने दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या Gen Z आंदोलनावर टीका करत आंदोलकांना गटारछाप पिढी असे संबोधले. आंदोलनातील भाषा आणि वर्तनावर आक्षेप घेत तिने हे आंदोलन अत्यंत असभ्य असल्याचा दावा केला. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी कंगना रणौतवर जोरदार टीका केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करत तिच्यावर कठोर शब्दांत निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा वक्तव्यांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, कंगना रणौतने आंदोलनात वापरण्यात आलेल्या भाषेवर आणि घोषणांवर आक्षेप घेत, भारताच्या संस्कृतीला अशा प्रकारचे वर्तन शोभणारे नसल्याचे म्हटले. आंदोलनातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर मानसिक धक्का बसल्याचा दावा करत तिने स्वतःला *डिजिटल डिटॉक्स*ची गरज असल्याचेही सांगितले.
तसेच आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करत, अशा प्रकारच्या आंदोलनाला विद्यार्थी आंदोलन म्हणता येणार नाही, असेही कंगना रणौतने म्हटले. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.




