संजय राऊत फडणवीसांच्या नावाचा आग्रह धरत असताना पृथ्वीराज चव्हाणांची वेगळी भूमिका; केंद्रीय शिक्षण मंत्रीपदावरून मोठं विधान

संजय राऊत फडणवीसांच्या नावाचा आग्रह धरत असताना पृथ्वीराज चव्हाणांची वेगळी भूमिका; केंद्रीय शिक्षण मंत्रीपदावरून मोठं विधान

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नव्या शिक्षण मंत्र्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. या पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगळी भूमिका मांडत त्यांना विरोध दर्शवला आहे.

विशेष म्हणजे, खासदार संजय राऊत सातत्याने देवेंद्र फडणवीस हेच केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी योग्य असल्याचा दावा करत आहेत. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत फडणवीसांना या पदासाठी योग्य मानता येणार नाही, असं मत व्यक्त केलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 2026 च्या NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्रातील अनेक कोचिंग क्लासेस आणि पेपर तयार करणाऱ्यांची नावे समोर आली असून, फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असल्यामुळे या प्रकरणात त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. या संपूर्ण प्रकरणात सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा सहभाग होता का, हे निष्पक्ष एसआयटी चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

चव्हाण यांनी पुढे म्हटलं की, कोलमडलेली शिक्षण व्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी आणि तरुण पिढीशी थेट संवाद साधू शकणारा पूर्णवेळ राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मंत्री देशाला आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अशी क्षमता असलेला नेता दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

तसेच, सत्ताधारी पक्षातील नेत्यांवरील विश्वास कमी झाल्यामुळे एखाद्या शिक्षणतज्ज्ञ, माजी कुलगुरू किंवा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याला ही जबाबदारी दिली जाऊ शकते, असं मत त्यांनी व्यक्त केलं. राजकीय वर्तुळात कॉर्पोरेट क्षेत्रातील नंदन निलेकणी यांच्यासारख्या व्यक्तीचाही पर्याय चर्चेत येऊ शकतो, असं सूचक विधानही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.