राज ठाकरेंचा विश्वास नांगरे पाटील यांच्यावर थेट हल्ला; खाकी पोलीस दलाची की संघाची?
मुंबई (प्रतिनिधी) : नुकतेच नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट करत विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका केली आहे. पोलीस अधिकाऱ्याची निष्ठा ही केवळ संविधान, कायदा आणि पोलीस दलाशी असावी, कोणत्याही राजकीय किंवा वैचारिक संघटनेशी नसावी, असे राज ठाकरे यांनी म्हटले.राज ठाकरे यांनी पुढे असेही म्हटले की, जर एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या संघटनेबद्दल उघडपणे भूमिका घ्यायची असेल, तर त्यांनी सरकारी सेवेचा राजीनामा देऊन त्या संघटनेत सहभागी व्हावे. सेवेत राहून निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे वर्तन टाळले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
यासोबतच त्यांनी सरकारलाही प्रश्न विचारत, अशा प्रकारच्या कृतींवर सरकारची भूमिका काय असणार, असा सवाल उपस्थित केला आहे. यापूर्वी अशाच एका घटनेत पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई झाली होती, मग या प्रकरणातही समान निकष लागू होणार का, अशी विचारणाही त्यांनी केली.दरम्यान, विश्वास नांगरे पाटील यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या संपूर्ण प्रकरणावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.




