लाल दिव्याच्या गाड्यांकडे पाहत स्वप्नं रंगवली. आणि तूच मंत्री झालास!’ अजितदादांच्या जयंतीनिमित्त राजेंद्र पवारांच्या भावनिक आठवणी
पुणे (प्रतिनिधी) : आज अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामतीसह राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. त्यांच्या स्मृतीस्थळी कुटुंबीयांनी पुष्पांजली अर्पण करत आठवणींना उजाळा दिला. याच निमित्ताने त्यांचे भाऊ राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली भावनिक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या पोस्टमध्ये राजेंद्र पवार यांनी अजितदादांसोबतच्या बालपणापासून ते त्यांच्या राजकीय प्रवासापर्यंतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. लहानपणी बारामतीत कंदील घेऊन अंधारात एकमेकांना घाबरवणं, उन्हाळ्यात फाट्यात पोहायला जाणं, पाण्यात खेळून रस्त्यावर लोळत घरी परतणं, अशा अनेक खोडकर आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत.
ते पुढे लिहितात, शाळेचं सर्टिफिकेट आणताना भीतीपोटी घरी न जाता मुंबईच्या चौपाटीवर दिवस काढले होते. त्या काळात रस्त्यावरून जाणाऱ्या लाल दिव्याच्या गाड्या पाहून "आपण कधी अशा गाडीत बसणार?" अशी स्वप्नं रंगवायचो. आणि पुढे त्याच स्वप्नाची पूर्तता झाली, अजितदादा मंत्री झाले.
राजेंद्र पवार यांनी तात्यासाहेबांच्या अस्थीविसर्जनाचा प्रसंग, बेंगळुरूहून ट्रकमधून गायी आणतानाचा प्रवास, शेतीची कामं, पतंगबाजी, पंचमीचा मांजा आणि बालपणातील असंख्य आठवणीही या पोस्टमध्ये मांडल्या आहेत. प्रत्येक आठवणीत अजितदादांचा साधेपणा, कुटुंबावरील प्रेम आणि जिद्दीचा स्वभाव स्पष्टपणे दिसून येतो.
त्यांच्या या भावनिक शब्दांनी केवळ पवार कुटुंबच नव्हे, तर अजितदादांचे असंख्य समर्थक आणि कार्यकर्तेही भावूक झाले आहेत. सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, अनेक जण आपल्या प्रतिक्रिया देत अजितदादांना आदरांजली अर्पण करत आहेत.




