धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी मनसेच्या संदीप देशपांडे यांची सरकारकडे मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केंद्र सरकार, दिल्ली पोलिस आणि मुंबई महापालिका प्रशासनावर जोरदार टीका करत विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले. विद्यार्थ्यांवरील लाठीमार, नीट पेपरफुटी प्रकरण, तसेच मुंबईतील दुर्घटनांबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली.

दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करत देशपांडे म्हणाले की, पोलिसांनी कायद्याचे रक्षक म्हणून वागले पाहिजे, गुंडांसारखे नाही. आंदोलकांवर झालेल्या कारवाईची तुलना त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी करत सरकारवर हुकूमशाहीचा आरोप केला. विरोधी पक्षात असताना आंदोलकांवर बळाचा वापर करू नका, असा सल्ला देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वतःचीच जुनी भूमिका आठवावी, असेही ते म्हणाले.
दादरमधील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांशी झालेल्या कथित गैरवर्तनाचाही त्यांनी उल्लेख केला. "लोकशाहीत आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. जर आपण आज हुकूमशाहीविरोधात आवाज उठवला नाही, तर पुढची पिढी आपल्यालाच प्रश्न विचारेल," असे देशपांडे म्हणाले.
नीट पेपरफुटी प्रकरणावर बोलताना त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. "विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित इतक्या गंभीर प्रकरणात जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. संवाद टाळून प्रश्न सुटत नाहीत," असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे त्यांनी कौतुक करत, त्यांच्या संघर्षाला जनतेचा पाठिंबा असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी मुंबईतील चेंबूरमधील दुर्घटनांचाही मुद्दा उपस्थित केला. झाड पडून एका चिमुकल्याचा मृत्यू आणि गटारात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही महापालिकेने कोणावरही ठोस जबाबदारी निश्चित केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. या निषेधार्थ मनसेतर्फे आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
गार्डन विभागातील प्रशासकीय त्रुटी, अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि चेंबूर दुर्घटनेत केवळ कंत्राटदारावर कारवाई करून प्रशासनाला क्लीन चिट देण्यात आल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला. तसेच, महापालिका आयुक्तांना पत्र पाठवूनही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत व्यक्त करत प्रशासनाने लोकप्रतिनिधींशी संवाद वाढवावा, अशी मागणी त्यांनी केली.




