CJP आंदोलनानंतर मोबाईल चॅट्सची चौकशी! ऑफलाइन ॲप्सच्या लिंक्स, बलिदानाच्या उल्लेखामुळे दिल्ली पोलिस सतर्क
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या CJP च्या आंदोलनानंतर आता तपासाचा फोकस आंदोलनकर्त्यांच्या मोबाईल चॅट्सवर गेला आहे. 'संसद चलो' मोर्चात सहभागी झालेल्यांच्या कथित संदेशांची दिल्ली पोलीस सखोल तपासणी करत आहेत.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, काही चॅट्समध्ये इंटरनेट सेवा बंद पडल्यास संपर्क कायम ठेवण्यासाठी ऑफलाइन चॅट ॲप्स वापरण्याच्या सूचना आणि त्याच्या लिंक्स शेअर करण्यात आल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही, तर काही कथित संदेशांमध्ये आंदोलनाच्या ध्येयासाठी प्राणांचे बलिदान देण्याचाही उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे.
मात्र, या संदेशांची सत्यता आणि त्यामागील व्यक्तींची ओळख अद्याप पडताळली जात असून, तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणताही निष्कर्ष काढला जाणार नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन व्हिडिओ, मोबाईल डेटा आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. या हिंसक आंदोलनात 118 पोलीस कर्मचारी आणि सुमारे 70 आंदोलक जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, 15 ते 20 सरकारी वाहनांचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणी आतापर्यंत दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 10 एफआयआर दाखल करण्यात आले असून, हिंसाचार आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित सर्व बाबींचा तपास सुरू आहे.




