यूपीच्या रणांगणात विनोद तावडे सक्रिय; ‘4C’ रणनीतीने भाजपचं मिशन 2027, गेमचेंजर ठरणार?

यूपीच्या रणांगणात विनोद तावडे सक्रिय; ‘4C’ रणनीतीने भाजपचं मिशन 2027, गेमचेंजर ठरणार?

मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 च्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच तयारीला वेग दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी विनोद तावडे यांनी लखनौमध्ये बैठका घेत निवडणुकीच्या रणनीतीवर काम सुरू केलं आहे. दोन दिवसीय लखनौ दौऱ्यात विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यासोबतच पक्षाच्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा करून आगामी निवडणुकीचा आराखडा तयार करण्यात आला.

सूत्रांच्या माहितीनुसार, विनोद तावडे पुढील काही काळ उत्तर प्रदेशात राहून संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहेत. त्यांच्या रणनीतीचा मुख्य फोकस ‘4C’ वर असणार आहे. यामध्ये समन्वय, कार्यकर्ता वर्ग, जातीय समीकरणं आणि उमेदवारी या चार मुद्द्यांचा समावेश आहे.

 तावडे यांनी याआधीही विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये संघटन आणि रणनीतीची जबाबदारी सांभाळली आहे. बिहार, हरियाणा, केरळसह अनेक राज्यांमध्ये त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनाचा अनुभव आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

 आता उत्तर प्रदेशात भाजपसमोर सत्तेची हॅट्रिक साधण्याचं आव्हान आहे. त्यामुळे विनोद तावडेंची ‘4C’ रणनीती आणि संघटनात्मक तयारी आगामी निवडणुकीत किती प्रभावी ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.