सदावर्तेंवर रोहित पवारांचा घणाघात; “गाढविणीचं दूध पितात, म्हणून बुद्धीही तशीच चालते”
मुंबई (प्रतिनिधी) : मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप करणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. गुणरत्न सदावर्ते हे गाढविणीचं दूध पितात, त्यामुळे त्यांची बुद्धीही तशीच चालते, असा टोला रोहित पवारांनी लगावला. सदावर्ते हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असून, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी बोलत असल्याचा दावाही त्यांनी केला.

सदावर्ते यांच्या कपड्यांपासून त्यांच्या गॉगलपर्यंतच्या स्टाईलवरही रोहित पवारांनी टीका केली. गाढविणीचं दूध प्यायल्याचा डोक्यावर काय परिणाम होतो, हे त्यांच्याकडे पाहिल्यावर कळतं, असंही ते म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सामाजिक विषय असून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे. विविध समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी घटनादुरुस्तीची गरज असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबतही रोहित पवारांनी भाष्य केलं. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र भाजप आणि शिंदे गटातील काही लोक निवडणुकीत लक्ष घालत असल्याचा दावाही त्यांनी केला.




