अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु
बारामती (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. याचाच पहिला टप्पा म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर अंतिम मतदार यादी १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९३ हजार ४९६, महिला मतदारांची संख्या १ लाख ९० हजार २७१, तर इतर मतदारांची संख्या २४ असून एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कधी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. मात्र प्रशासनानं तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम आयोगाने जाहीर केला असून १ जानेवारी २०२६पर्यंत नाव नोंदविलेले मतदार पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार आहेत. तर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असणार आहे.
भारतीय संविधानानुसार कोणतीही व्यक्ती राज्याच्या विधिमंडळाची सदस्य नसतानाही मंत्री (उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री) म्हणून नियुक्त होऊ शकते. मात्र, हे पद टिकवून ठेवण्यासाठी, शपथ घेतल्यापासून सलग सहा महिन्यांच्या आत त्या व्यक्तीला विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे अनिवार्य असते. जर ते या कालावधीत सदस्य झाले नाहीत, तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे आता बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार लढणार असल्याची माहिती आहे.




