ब्रिटनच्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये एकनाथ शिंदेंचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये आज ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात आलं. या ऐतिहासिक सभागृहात मराठी भाषेचा गजर पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार-जय महाराष्ट्र’ अशी मराठीतून करत एकनाथ शिंदे यांनी भाषेचा अभिमान व्यक्त केलाच, पण महाराष्ट्राच्या विकासाची कहाणीही मांडली. आई आणि पत्नीच्या कष्टातून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची माझी विचारसरणी घडली, असं एकनाथ शिंदे यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

मुंबई आणि लंडन ही दोन्ही महत्त्वाची वित्तीय केंद्रे आहेत. फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्र-ब्रिटन सहकार्याला मोठी संधी असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी ‘नमस्कार... जय हिंद-जय महाराष्ट्र’ म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. ‘रिस्पेक्टेड बेरोनेस...’ म्हणत एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनच्या संसदेत भाषण करण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी बहुमान असल्याचं सुरुवातीलाच म्हटलं.
आपल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्र सरकारने जनहितासाठी केलेल्या कामांची माहिती देत महिला सक्षमीकरणावरही भर दिला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील गेमचेंजर योजना ठरल्याचं त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच, हा सन्मान महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा असल्याचं त्यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सुरेश भट यांच्या कवितेचाही उल्लेख केला. ‘लाभले आम्हास भाग्य, जाणतो मराठी...’ ही कविता म्हणून दाखवत त्यांनी मातृभाषा मराठी आणि महाराष्ट्राची ओळख ब्रिटनच्या संसदेला करून दिली.
तसंच, मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध योजनांचा उल्लेख करत जनहितासाठी या योजनांची कशाप्रकारे अंमलबजावणी करण्यात आली, याची माहितीही त्यांनी दिली. ‘इट इज अ पिपल सेंट्रीक अप्रोच टू द पब्लिक सर्व्हिस...’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी फाडफाड इंग्रजीत केलेल्या भाषणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. महाराष्ट्रातील गेमचेंजर ‘लाडकी बहीण योजना’ ही काही चॅरिटी नसून महिलांच्या सबलीकरणाची योजना बनली आहे. जागतिक स्तरावरील संस्थांनीही लाडकी बहीण योजनेची दखल घेतल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
त्यासोबतच, ‘शासन आपल्या दारी’ या योजनेमुळेही लाखो लोकांना फायदा झाला. केवळ रस्ते बांधणे म्हणजे विकास नाही, तर विकास लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या ध्येयाचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. महाराष्ट्राने विकासाची गती पकडली आहे, असं सांगताना मुंबई आणि लंडन हे जगातील दोन मोठे आर्थिक केंद्र असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे हा सोहळा पार पडला. यावेळी उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर, यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे, तसेच संसदेच्या सभागृहांचे सदस्य, ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी हा बहुमान त्यांना देण्यात आला. विशेषतः त्यांच्या कार्यकाळातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि नागरिकांना शासकीय सेवा थेट घरापर्यंत पोहोचवणारा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना गौरविण्यात येत असल्याचं त्यांच्या मानपत्रात नमूद करण्यात आलं आहे.




