"विधानपरिषदेत अनिल परब-नीलम गोऱ्हेंची जोरदार जुगलबंदी! सचिन अहिरांच्या निवडीवर बुलडोझरचा टोला"
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील विधानपरिषदेत उपसभापतीपदी आमदार सचिन अहिर यांची सर्वानुमते निवड झाल्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर चर्चा रंगली. मात्र या चर्चेदरम्यान लक्ष वेधून घेतली ती शिवसेनेच्या दोन्ही गटांतील नेते अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्या शाब्दिक जुगलबंदीने.

नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात उपसभापती म्हणून केलेल्या कामकाजाची आठवण सांगितली. त्या म्हणाल्या की, त्या काळात त्यांच्यावर अनेकदा टीका झाली होती, विशेषतः अनिल परब यांनी सातत्याने टीका केली. मात्र प्रत्येकाने आपापली भूमिका पार पाडली, असे सांगत त्यांनी मिश्किल टोला लगावला.
याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच सभागृहात समोर असताना "उजवीकडे बघायचं की डावीकडे?" असा प्रश्न पडायचा, अशी आठवण सांगत सभागृहात हशा पिकवला. तसेच मिलिंद नार्वेकर यांचाही उल्लेख करत त्यांच्या समन्वयाच्या भूमिकेचे कौतुक केले.यानंतर बोलताना अनिल परब यांनी सचिन अहिर यांच्या सर्वपक्षीय संबंधांचे कौतुक केले. उपसभापती झाल्यानंतर ते आता कोणत्याही एका पक्षाचे राहिले नसून संपूर्ण सभागृहाचे आहेत, असे त्यांनी सांगितले. यासोबतच "सत्तेचा माज नसावा आणि अल्पमताचा न्यूनगंडही नसावा," असा संदेशही त्यांनी दिला.
मात्र भाषणाच्या शेवटी अनिल परब यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावत, "सचिन अहिरांचा बुलडोझर असा फिरला की काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला, आणि बुलडोझर कधी आला हेही कळलं नाही," असे वक्तव्य केले. या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून, त्याचा रोख नीलम गोऱ्हेंकडे असल्याची चर्चा सुरू आहे.सचिन अहिर यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने सुरू झालेली चर्चा अखेर राजकीय टोलेबाजीपर्यंत पोहोचली आणि विधानपरिषदेत पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांतील शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला.




