लग्नाचं आमिष, 14 वर्षांचे संबंध अन् आर्थिक फसवणुकीचा आरोप; ZP सदस्याविरोधात पोलिसांची मोठी माहिती
पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीतील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरोधात लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक आणि वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी तपासाबाबत माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेत भरसभेत एका तरुणीने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. उपस्थित पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मंगेश जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैतन्य कदम यांनी सांगितले की, हा गुन्हा सुरुवातीला पुणे शहरात दाखल झाला होता. मात्र, घटनास्थळ माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तो तेथे वर्ग करण्यात आला. फिर्यादीनुसार, 2012 ते 2026 या कालावधीत लग्नाचे आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा तसेच सुमारे 8 ते 10 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचे आणि मंगेश जगताप यांचे कॉलेजपासून सुमारे 14 वर्षांचे प्रेमसंबंध होते. लग्नाचे आश्वासन देत संबंध कायम ठेवण्यात आले. मात्र, नंतर त्यांनी दुसरे लग्न केल्याचे समोर आल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच घटस्फोटाशी संबंधित दाखवण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचाही दावा तिने केला आहे.
याशिवाय, पीडितेने मंगेश जगताप यांच्या कुटुंबीयांवर आणि काही मित्रांवरही गंभीर आरोप केले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




