दिल्लीत आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके अनिश गवांडे यांच्या घरी? नव्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता आणखी एक महत्त्वाची राजकीय माहिती समोर आली आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिश गवांडे यांच्या घरी मुक्कामी असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या घडामोडींवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत वास्तव्यास असताना अभिजीत दिपके यांनी अनिश गवांडे यांच्या घरी मुक्काम केला होता. याच आंदोलनादरम्यान शरद पवार यांनी जंतर-मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांची आणि अभिजीत दिपके यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने या घटनांबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके म्हणाले, "अनिश गवांडे माझा चांगला मित्र आहे. मित्र म्हणून मी त्यांच्या घरी राहिलो. त्यापलीकडे कोणताही वेगळा अर्थ नाही. शरद पवार यांची माझी पहिली भेट जंतर-मंतरवरच झाली. विद्यार्थ्यांवरील कथित मारहाणीच्या पार्श्वभूमीवर ते चर्चा करण्यासाठी आले होते."
दरम्यान, जंतर-मंतर येथे सुमारे 35 दिवस विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
दिल्लीतील आंदोलनानंतर सुमारे 40 दिवसांनी अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये परतले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका करत, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले. तसेच, "सरकारने वेळेत योग्य निर्णय घेतले नाहीत, तर विद्यार्थी भविष्यात आणखी मोठी भूमिका बजावतील," असा इशाराही त्यांनी दिला.




