केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात श्रीकांत शिंदेंची वर्णी निश्चित? राज्यमंत्रिपदासाठी चुरस

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात श्रीकांत शिंदेंची वर्णी निश्चित? राज्यमंत्रिपदासाठी चुरस

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आला असून, शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, कॅबिनेट मंत्रिपदासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, राज्यमंत्रिपदासाठी पक्षातील अनेक खासदारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी या दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना अधिकचं उधाण आलं आहे.

राज्यमंत्रिपद कोणाला द्यायचं, यावर पक्षात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. संघटनात्मक दृष्टिकोनातून हे पद विदर्भात द्यायचं की मराठवाड्यात, यावरही विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

ठाकरे गटातून शिंदे गटात आलेले खासदार संजय जाधव हे मराठवाड्यातील प्रमुख चेहरा मानले जात असल्याने त्यांच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडे, पक्षातील सर्वात ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव यांनाही डावलणं सोपं नसल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचाही राज्यमंत्रिपदासाठी विचार सुरू असल्याची चर्चा आहे.

अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्याने पक्षाच्या खासदारांची संख्या १३ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून शिवसेनेचं केंद्रातील राजकीय वजन वाढलं असून, त्याचा फायदा मंत्रिमंडळ विस्तारात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत घोषणा कधी होते आणि शिवसेनेच्या वाट्याला नेमकी कोणती नावं येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.