त्या मुलीवर दबाव टाकला, रूममध्ये कोंडलं?; COEPमध्ये रात्री नेमकं काय घडलं?

त्या मुलीवर दबाव टाकला, रूममध्ये कोंडलं?; COEPमध्ये रात्री नेमकं काय घडलं?

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या आधी शुक्रवारी पुण्यातील COEP कॉलेजमध्ये काँग्रेस आणि ABVPच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमाच्या आधी नेमकं काय घडलं, याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली. त्यांनी आरोप केला की, ज्या मुलींनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाबाबत मोकळेपणाने आपले प्रश्न मांडले, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. एका मुलीला रूममध्ये बंद करून स्टेटमेंट मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा दावाही त्यांनी केला.

“सत्य असूनही त्या दबावापोटी तुला माफी मागावी लागली, याबद्दल मी त्या मुलीची माफी मागतो,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली, मात्र सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.पोलिसांच्या लाठीमारात दोन काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. एका कार्यकर्त्याला हात-पायाला फ्रॅक्चर झाल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनीही या घटनेवर भाष्य केलं. काँग्रेसचे कार्यकर्ते केवळ त्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते, असा दावा त्यांनी केला.शिवानी वडेट्टीवार यांच्या आरोपानुसार, संबंधित मुलीवर मॅनेजमेंटच्या माध्यमातून दबाव टाकण्यात आला, तिला रूममध्ये कोंडून ठेवण्यात आलं आणि माफी मागायला लावण्यात आली. तिचा फोन बंद होता आणि तिच्या हॉस्टेलखालील कॅमेरा बंद ठेवण्यात आल्याचाही त्यांनी दावा केला.

तसेच त्या मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या इतर मुलींनाही भेटू दिलं नाही आणि ABVPच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारण्यासाठी धाव घेतल्याचा आरोप शिवानी वडेट्टीवार यांनी केला आहे.या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेस आणि ABVPमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, COEP कॉलेजमध्ये नेमकं काय घडलं, याबाबत पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.