निवृत्तीनंतरही पोलीस डॉग पोलिसांसोबतच राहणार; CM देवेंद्र फडणवीसांचा संवेदनशील निर्णय
मुंबई (प्रतिनिधी) : पोलीस दलात 10 वर्षांची अखंड सेवा बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या उर्वरित आयुष्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. पोलीस दलातील सेवा पूर्ण झाल्यानंतरही हे श्वान आता पोलिसांसोबतच राहणार आहेत. त्यांच्या भोजनाचा आणि इतर देखभालीचा सर्व आर्थिक भार गृहविभाग उचलणार आहे.

पोलीस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर श्वान निवृत्त होतो. या 10 वर्षांच्या प्रदीर्घ काळात त्या श्वानाला त्याच्या रखवालदारासोबत राहण्याची आणि भोजनाची सवय झालेली असते. त्यांच्यात आपुलकीचा आणि विश्वासाचा एक घट्ट बंध निर्माण होतो. आतापर्यंत निवृत्तीनंतर अशा श्वानांना इतर ठिकाणी दत्तक दिले जायचे. मात्र नियमित साथीदार आणि परिचित वातावरणापासून दूर गेल्यामुळे या श्वानांचे मानसिक स्वास्थ्य बिघडायचे आणि अनेकदा ते अन्नत्यागही करायचे.
पोलीस दलाला आपल्या आयुष्याची 10 वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्तीच्या काळात श्वानांचे असे हाल होणे योग्य नाही. तो श्वान असला तरी त्याच्या सेवेचा आदर करत त्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. निवृत्तीनंतर त्यांच्या वाट्याला दुःखाचे जीवन येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे 10 वर्षे सेवा देऊन निवृत्त झालेला श्वान पोलीस विभागासोबतच राहणार आहे. त्यामुळे त्याच्या रखवालदारासोबतचे ऋणानुबंध कायम राहतील आणि त्याचे उर्वरित आयुष्य सुखकर व आनंदी जाईल. श्वानांच्या भोजनासाठी आणि देखभालीसाठी येणारा सर्व आर्थिक भार गृहविभाग उचलणार आहे.
केवळ पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीच नव्हे, तर पोलीस दलाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या प्रामाणिक श्वानांच्या उर्वरित आयुष्याचीही काळजी घेणाऱ्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




