मनोज जरांगेंची सत्तारांसमोर एकनाथ शिंदेंबाबत नाराजी; अब्दुल सत्तार म्हणाले, ‘मी मित्र म्हणून आलोय’

मनोज जरांगेंची सत्तारांसमोर एकनाथ शिंदेंबाबत नाराजी; अब्दुल सत्तार म्हणाले, ‘मी मित्र म्हणून आलोय’

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे अचानक मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाल्याने या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. या भेटीदरम्यान जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अब्दुल सत्तार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.

संजय शिरसाट यांच्यावर मनोज जरांगे यांनी गंभीर आरोप केल्यानंतर लगेचच अब्दुल सत्तार अंतरवालीत पोहोचल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. आगामी आंदोलनाची धग कमी करण्यासाठी आणि सरकारच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी सत्तार तिथे गेल्याचं बोललं जात आहे.या भेटीदरम्यान मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सत्तारांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. “चूक होत असते, ती दुरुस्त करा,” असा थेट सल्ला जरांगे यांनी यावेळी दिला.

यावर अब्दुल सत्तार यांनी, “मी येथे एक मित्र म्हणून आलो आहे, सरकार नक्कीच काहीतरी मार्ग काढेल,” असं आश्वासन दिलं. तसेच “संघर्ष होणार नाही, आपल्याला माझी हात जोडून विनंती आहे,” असंही त्यांनी मनोज जरांगे यांना सांगितलं.यावेळी मनोज जरांगे म्हणाले, “काय सांगावं संघर्ष करतात का काय ते? तुमचे फडणवीस साहेब डायरेक्ट गोळ्या घालते, अजून शिंदे साहेब आहेत त्यांना.” यावर अब्दुल सत्तार यांनी, “सरकारला समाजाप्रति पूर्ण सहानुभूती आहे. सरकार दोन पावले मागे-पुढे आलं तर तुम्हीसुद्धा विचार करावा. समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, याची पूर्ण दक्षता सरकार घेत आहे,” असं म्हटलं.

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आहेत. हे उपोषण अंतरवाली सराटीत होणार की मुंबईत, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, मनोज जरांगे यांनी उपोषण अंतरवाली सराटीतच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.मात्र, प्रश्न निकाली निघाला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला निघणार असल्याचा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणाआधी राज्य सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.