राम मंदिराच्या दानपेटीतून पैशांची चोरी! अखिलेश यादवांच्या आरोपांनंतर चौघे ताब्यात, प्रकरण काय?

राम मंदिराच्या दानपेटीतून पैशांची चोरी! अखिलेश यादवांच्या आरोपांनंतर चौघे ताब्यात, प्रकरण काय?

मुंबई (प्रतिनिधी) : अयोध्या राममंदिरासाठी जमा करण्यात आलेल्या वर्गणीत घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप  समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. अशातच अखिलेश यादवांचा हा दावा विश्वस्त दिनेंद्र दास यांनी फेटाळलाय. असा कोणताही घोटाळा झालेला नाही, सर्व विश्वस्तांवर विश्वास असल्याचं ते म्हणाले. मात्र तरीही कोणाला शंका असल्यास चौकशी होऊ देण्यासही हरकत नाही, असं त्यांनी म्हटलंय. कोणी काही चुकीचं केलं असेलच तर त्याला प्रभू श्रीराम शिक्षा करतील असंही ते म्हणाले. असं असताना, राम मंदिरात देणगी मोजणी दरम्यान देणगीच्या कथित अपहार प्रकरणी राम मंदिर परिसरात रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता आणि चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर ट्रस्टने एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या कर्तव्यातून मुक्त केले आहे. 

दरम्यान, या अपहारानंतर अधिकारी रात्री उशिरापर्यंत राम मंदिर परिसरात उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देणगी पेटीत देणगी मोजण्यासाठी तैनात असलेल्या एसबीआयच्या चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. चौघांकडून वसुली करण्यात आली आहे. यात्री सुविधा केंद्रातूनही वसुली करण्यात आली आहे. मात्र या चौकशीबाबत पोलीस अधिकारी आणि ट्रस्टचे अधिकारी मौन बाळगून आहेत.

एकंदरीत या सर्व प्रकरणावर समाजवादी पक्षाचे (एसपी) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी दावा केला की, अयोध्येतील राम मंदिरासाठी दान केलेले कोट्यवधी रुपये गायब झाले आहेत. अखिलेश यादव यांनी न्यायालयाला या प्रकरणाची स्वतःहून दखल घेण्याची विनंती केली. रविवारी 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये ते म्हणाले, "जगभरातील प्रभू रामाच्या भक्तांसाठी ही एक अत्यंत संवेदनशील बातमी आहे की राम मंदिरासाठी दान केलेले कोट्यवधी रुपये गायब झाले आहेत." अखिलेश यादव यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, "मंदिर ट्रस्टसाठी ही एक अत्यंत लाजिरवाणी परिस्थिती आहे. स्पष्टीकरण देण्यासाठी कोणीही पुढे येऊ इच्छित नाही." माजी मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले, "न्यायालयाला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी, कारण याचा थेट संबंध जगभरातील संपूर्ण सनातनी समाजाच्या प्रभू रामावरील गाढ श्रद्धेशी आहे. सरकारचे मौन संशयास्पद आहे."