महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा हालचाली? ऑपरेशन टायगर 3'ची चर्चा

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा हालचाली? ऑपरेशन टायगर 3'ची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचालींची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर 3' राबवण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जात आहे.

यापूर्वी काही खासदार आणि नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही आमदार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकप्रतिनिधींशी संपर्क सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत संबंधित पक्षांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

सूत्रांच्या दाव्यानुसार, ठाकरे गटातील काही आमदारांशी सातत्याने चर्चा सुरू असून पक्षांतरबंदी कायद्याचा विचार करून पुढील रणनीती आखली जात आहे. तसेच ठाकरे गटातील एका खासदारासोबतही संपर्क झाल्याचे बोलले जात आहे.

याशिवाय, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार आणि खासदारांशीही प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांची पडद्यामागे भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, नाशिक महापालिकेच्या राजकारणातही 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटातील काही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना वेग आल्याचे सांगितले जात आहे.

या सर्व चर्चांदरम्यान ठाकरे गटाने मात्र एकजूट कायम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे गटनेते अजय बोरस्ते यांनी हे कोणतेही 'ऑपरेशन' नसून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाविषयी असलेल्या आकर्षणामुळे अनेक जण संपर्क साधत असल्याचा दावा केला आहे.

या सर्व घडामोडींमध्ये नेमके काय घडते, कोण कोणता निर्णय घेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठे राजकीय समीकरण बदलते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.