आंदोलनाला बळ देण्यासाठी उद्धव ठाकरेंची विरोधकांना एकत्र आणण्याची रणनीती
मुंबई (प्रतिनिधी) : राजधानी दिल्लीत नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष सहभागी होत आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके यांच्याशी ते सातत्याने संपर्कात होते. तसेच, उपोषण करणारे सोनम वांगचूक यांनी प्रकृतीची काळजी घेऊन उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली होती.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले. जंतर-मंतर येथे आंदोलकांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तरुण आणि महिलांवर होत असलेली कारवाई लोकशाहीला शोभणारी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला असंतोष आता रस्त्यावर उतरला आहे, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, काँग्रेसनेही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करताना राहुल गांधींसह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आता उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्याशी फोनवर चर्चा करून इंडिया आघाडीतील सर्व विरोधी पक्षांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अधिक भक्कम पाठिंबा कसा द्यावा, यावर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. तसेच, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच्या चर्चेतही विरोधकांनी एकत्रितपणे या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहावे, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगितले जाते.
उद्धव ठाकरे यांच्या मते, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याने आंदोलनाची दिशा आणि स्वरूप बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात विरोधक या आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.




