ईडीची तृणमूल काँग्रेसच्या 440.42 कोटींच्या खात्यांवर गोठवण्याची कारवाई; आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू
मुंबई (प्रतिनिधी) : सक्तवसुली संचालनालयाने (ED) प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत तृणमूल काँग्रेसशी संबंधित HDFC बँकेतील तीन खात्यांमधील सुमारे 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई कोलकाता सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या FIR च्या आधारे करण्यात आली असून, आर्थिक गैरव्यवहार, बेकायदेशीर निधी संकलन आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे.

या तपासादरम्यान ईडीने केअरवेल ग्रुप ऑफ कंपनीजच्या पाच ठिकाणी छापेमारी केली. तपास यंत्रणेनुसार, एप्रिल 2023 ते जून 2026 या कालावधीत तृणमूल काँग्रेसच्या खात्यांमधून सुमारे 160 कोटी रुपये केअरवेल एव्हिएशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि संबंधित कंपन्यांकडे वर्ग करण्यात आल्याचा संशय आहे.
ईडीच्या तपासानुसार, या निधीचा काही भाग 'एम्ब्रेअर लेगसी 600' विमान आणि 'ऑगस्टा 109 ग्रँड न्यू' हेलिकॉप्टर खरेदीसाठी वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्यवहारांसाठी परदेशातून कर्ज घेतल्याचाही तपास यंत्रणांचा दावा आहे.
दरम्यान, या तीन बँक खात्यांवरून तृणमूल काँग्रेसमधील दोन गटांमध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची सुनावणी कलकत्ता उच्च न्यायालयात सुरू असून, खात्यांवर गोठवण्याची कारवाई आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची कायदेशीर छाननी अद्याप सुरू आहे.या प्रकरणातील सर्व आरोपांची चौकशी सुरू असून, अंतिम निष्कर्ष न्यायालयीन आणि तपास प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहेत.




