एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंना केले अभिवादन,जपली परंपरा
मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळवडीच्या सणानिमित्त ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रमात जाऊन स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना रंग लावून विनम्रपणे अभिवादन केले. होळी आणि धुळवडीचा सण सर्वांसाठी सुख समाधान ऐश्वर्य आनंद आणि सप्तरंगाची उधळण करणारा ठरो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देताना शिंदे म्हणाले की, सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि सप्तरंगांची उधळण होवो, अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. बळीराजा शेतकरी, कामगार, कष्टकरी, लाडक्या बहिणी-भावांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची बरसात व्हावी, हीच भावना असल्याचे त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
यंदा शिवसेना परिवारातील काही पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यतींचे निधन झाल्याने तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शिंदे यांनी यंदा धुळवड न साजरी करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी हे सण उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात; मात्र यंदाच्या होळी-धुलीवंदन सणावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाचे सावट आहे. तसेच शिवसेनेच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातही दुःखद घटना घडल्याने यंदा जल्लोष टाळून परंपरा जपण्यावर भर देण्यात येत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.




