नौसैनिकाचे टोकाचे पाऊल! आधी पत्नी अन् दोन लहान मुलांचा घेतला जीव?, नंतर स्वतः गळफास लावून केली आत्महत्या
मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सर्वत्र सुरू असतानाच, दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील 'नेव्ही नगर' परिसरात एक अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह दोन लहान मुलांची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. १५ ऑगस्ट रोजी चौघांचेही मृतदेह त्यांच्या राहत्या घरात संशयास्पद स्थितीत आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

चिमुकल्यांवर विषप्रयोगाचा संशय
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत मुलांमध्ये एका दोन महिन्यांच्या बाळाचा आणि तीन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. नौदल कर्मचाऱ्याने आधी पत्नी आणि दोन्ही मुलांना विष देऊन मारले असावे आणि त्यानंतर स्वतः गळफास घेतला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
पोलीस आणि नौदलाकडून संयुक्त तपास
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होईल. याप्रकरणी पोलीस आणि भारतीय नौदलाकडून संयुक्तपणे तपास सुरू आहे.
भारतीय नौदलाचे अधिकृत निवेदन
या दुर्दैवी घटनेवर भारतीय नौदलाने अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. "१५ ऑगस्ट रोजी नेव्ही नगर, कुलाबा येथे नौसैनिकाचा त्याच्या कुटुंबासह मृतावस्थेत शोध लागला आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून भारतीय नौदल तपासासाठी पूर्ण सहकार्य करत आहे," असे नौदलाने स्पष्ट केले आहे.




