प्ले-स्कूलचा धक्कादायक हलगर्जीपणा! 23 महिन्यांच्या चिमुकल्यावर वर्गात अमानुष मारहाण

प्ले-स्कूलचा धक्कादायक हलगर्जीपणा! 23 महिन्यांच्या चिमुकल्यावर वर्गात अमानुष मारहाण

औरंगाबाद (प्रतिनिधी) : प्ले-स्कूलमध्ये आपल्या मुलांना सुरक्षित समजून सोडणाऱ्या पालकांसाठी ही बातमी धक्कादायक आहे. छत्रपती संभाजीनगरातील सिडको परिसरातील एका नामांकित प्री-स्कूलमध्ये गंभीर निष्काळजीपणामुळे अवघ्या 23 महिन्यांच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण आणि शारीरिक छळ सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे.

सिडकोतील 'फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स प्री-स्कूल'मध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. माहितीप्रमाणे, वर्गातील मदतनीस महिलेने काही लहान मुलांना वर्गातच ठेवून बाहेरून दरवाजा लॉक केला आणि तेथून निघून गेली. त्या वेळी वर्गात कोणताही शिक्षक किंवा जबाबदार कर्मचारी उपस्थित नव्हता.दरम्यान, वर्गात असलेल्या एका मुलाने 23 महिन्यांच्या बालकावर आणि एका बालिकेवर हल्ला केला. संबंधित बालकाच्या चेहरा, नाक, ओठ, छाती, पाठ आणि पायांवर गंभीर जखमा झाल्या असून त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी चाव्यांच्या खुणा आढळल्या आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, हा प्रकार बराच वेळ सुरू असतानाही शाळेतील कोणत्याही कर्मचाऱ्याने मुलांची विचारपूस केली नाही. तसेच घटनेनंतरही शाळा प्रशासनाने पालकांना तातडीने माहिती दिली नसल्याचा आरोप आहे.दुपारी मुलाला घ्यायला आलेल्या पालकांना सुरुवातीला केवळ किरकोळ ओरखडे असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर बालकाच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याचे समोर आले.

यानंतर पालकांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. व्यवस्थापनाने सुरुवातीला टाळाटाळ केल्याचा आरोप असून, नंतर काही संपादित क्लिप्स देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.जखमी बालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सहा जणांविरोधात सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्री-स्कूलसारख्या ठिकाणी लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ही घटना असून, याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी पालकांकडून केली जात आहे.