'डॉ. डी. वाय. पाटील यांनी कृतार्थ जीवन जगले' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

'डॉ. डी. वाय. पाटील यांनी कृतार्थ जीवन जगले' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

कोल्हापूर / प्रतिनिधी: "पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांतील जुन्या पिढीतील अग्रगण्य नेतृत्व होते. त्यांनी अत्यंत कृतार्थ जीवन जगले. त्यांच्यासारख्या जाणत्या आणि अनुभवी नेत्याच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'यशवंत' निवासस्थानी भेट देऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोकराव माने, राहुल आवाडे आणि शिवाजी पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

'ते केवळ नेते नव्हे, तर विचारवंत होते'
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "अत्यंत संघर्षातून त्यांनी विविध क्षेत्रांत भरीव योगदान दिले आणि त्या माध्यमातून सामान्य माणसाला दिलासा देण्याचे कार्य केले. ते केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर एक विचारवंत होते. राज्यपाल म्हणून त्यांनी तीन राज्यांची जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळली. आमदार तसेच इतर विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला."

पुढे बोलताना त्यांनी सांगितले, "अध्यात्म आणि जीवनाला समृद्ध करणारा विचार त्यांनी समाजाला दिला. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी व संपूर्ण कुटुंबीयांनी त्यांचे विचार आणि कार्य तितक्याच निष्ठेने पुढे नेले आहे." या वेळी १९९८ मध्ये स्वतः महापौर असताना डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निवासस्थानी झालेली आपली पहिली भेट ही एक आठवण म्हणून त्यांनी आवर्जून सांगितली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडूनही सांत्वन

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी डॉ. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या वेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.