विद्यार्थ्यांच्या वेदना पाहून अण्णा हजारे भावुक; आंदोलनस्थळी पोस्टर पाहताच डोळ्यात आले अश्रू
मुंबई (प्रतिनिधी) : अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी मौन आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनस्थळी पोहोचताच विद्यार्थ्यांच्या हातातील पोस्टर पाहून त्यांना अश्रू अनावर झाले.

दिल्लीतील जंतर मंतरवर NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांनी अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथे मौन आंदोलन सुरू केले आहे. महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ सुरू असलेल्या या आंदोलनस्थळाला ‘नगरचे जंतर मंतर’ असे नाव देण्यात आले आहे.आंदोलनस्थळी आलेल्या विद्यार्थ्यांनी हातात घेतलेले पोस्टर आणि त्यांच्यातील नाराजी पाहून अण्णा हजारे काही काळ भावुक झाले. विद्यार्थ्यांच्या संघर्षाशी एकरूप होत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
दरम्यान, अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज दडपण्याऐवजी संवादातून प्रश्न सोडवले पाहिजेत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.देशातील लाखो तरुण पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, बेरोजगारी यांसारख्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. या प्रश्नांकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय म्हणून न पाहता, तरुणांच्या अपेक्षा आणि वेदना म्हणून पाहण्याची गरज असल्याचे अण्णांनी नमूद केले आहे.
NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि निकालातील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामध्ये प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे असल्याचे सांगत, वरिष्ठ स्तरावरही उत्तरदायित्व असले पाहिजे, अशी भूमिका अण्णा हजारे यांनी मांडली आहे.आता अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




