'फडणवीसांचा मला फोन आला होता'; हैदराबाद गॅझेटच्या GR नंतर मुख्यमंत्री काय म्हणाले? जरांगेंचा मोठा दावा

'फडणवीसांचा मला फोन आला होता'; हैदराबाद गॅझेटच्या GR नंतर मुख्यमंत्री काय म्हणाले? जरांगेंचा मोठा दावा

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दहावा दिवस असून, राज्य सरकारने अद्याप त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या नसल्याने त्यांचं उपोषण सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फोन केला होता, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर फडणवीसांचा फोन आला होता. या जीआरनुसार एकही मराठा वंचित राहू देणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं.

 सरकार जाणूनबुजून हयगय आणि हलगर्जीपणा करत आहे. त्यामुळे मराठा समाजाचा रोष वाढत आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. सरकारला आम्ही 12 तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे. सर्व मंत्र्यांनी तुम्हाला उपोषण करण्याची वेळ येणार नाही, असं सांगितलं होतं. मार्च आणि फेब्रुवारीमध्ये प्रसाद लाड यांनीही आम्हाला बोलवा, फडणवीस मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करतील, असं म्हटलं होतं. त्यामुळे लाड यांना बोलावलं होतं; मात्र एका वर्षात त्यांनी काही केलं नाही, असा आरोप जरांगे यांनी केला.

 मला फडणवीसांचा फोन आला होता. त्यांनी फोन केला नाही असं म्हटलं तर मी सगळं सांगतो, आमच्याकडे CCTV फुटेजही आहेत, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. फडणवीसांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. फक्त सातारा आणि कोल्हापूरमध्ये दोन महिने थांबा, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी मी त्यांना भाऊ म्हणून संबोधलं. मला राजकारणाशी काही देणंघेणं नाही, असंही मी त्यांना सांगितलं होतं, अशी माहिती जरांगे यांनी दिली.

 यानंतर जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर आणखी गंभीर आरोप केले. फडणवीस गोड बोलून पायाखाली घालतात, असा आरोप करत त्यांनी एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे, महाजनांचं घर, निलंगेकरांचं घर, विनोद तावडे आणि नितीन गडकरी यांच्या राजकीय संदर्भांचा उल्लेख केला. नारायण राणे, अशोक चव्हाण आणि विखे पाटील यांच्या घरालाही फडणवीसांनी राजकारणात पायाखाली घातल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

 याचवेळी त्यांनी सातारा आणि कोल्हापूरच्या राजघराण्यांवरही टीका केली. राजगादीचे सगळे राजे शांत बसले आहेत. कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादीवर अशी वेळ येऊ नये, असं जरांगे पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावरही जरांगे यांनी बोचरी टीका केली. एकनाथ शिंदेंबद्दल मला आता लाज वाटते. त्यांनी मराठ्यांचा तळतळाट घेतला, तो आपला नाही, असं ते म्हणाले.

 राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी लक्षात घ्यावं, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं. एकदा लाट उसळली तर ती दिल्लीपर्यंत जाऊ शकते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी फडणवीसांना समजावून सांगावं, कारण देवेंद्र फडणवीसांमुळे आंदोलन आणखी चिघळू शकतं, असा दावा जरांगे यांनी केला.

 सव्वा ते तीन कोटी मराठे मुंबईत येऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी आंदोलकांनी स्वसंरक्षणासाठी झाडू ठेवावा आणि आजपासून कामाला लागावं, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच सर्वांनी 12 तारखेला अंतरवालीमध्ये उपस्थित राहावं, असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मंत्री उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. विखे पाटील यांनी नुकतीच ऑनलाइन बैठक घेतली होती. आपणही त्या बैठकीला उपस्थित होतो आणि सर्व अधिकारीही बैठकीत होते. या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

 तुमच्या माध्यमातून मी जरांगे पाटील यांना विनंती करतो की, त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. प्रश्न सुटत राहतील, मात्र आपली प्रकृती आणि जीवही महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित करावं, अशी विनंती उदय सामंत यांनी केली. तसंच, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही, ही महायुती सरकारची भूमिका असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनीही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचं जाहीर केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.