सहावीच्या मराठी पुस्तकातील 'लोकनृत्य' धड्यावरून वाद; महाराष्ट्राच्या लोकनृत्यांना दुय्यम स्थान?
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात यंदापासून शालेय शिक्षणात सीबीएसई पॅटर्ननुसार बदल करण्यात आले असून मराठी विषय सक्तीचा ठेवण्यात आला आहे. मात्र, बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' या धड्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या धड्यात एकूण पाच लोकनृत्यांचा समावेश असला तरी त्यापैकी महाराष्ट्रातील केवळ वारकरी दिंडी या एका लोकनृत्याचा उल्लेख असून उर्वरित चार लोकनृत्ये इतर राज्यांतील आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेला अपेक्षित स्थान मिळाले नसल्याची टीका होत आहे.

ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी तसेच शिक्षणतज्ज्ञ आणि सांस्कृतिक अभ्यासकांनी या बाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, सहावीच्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची व्यापक ओळख करून देणे आवश्यक होते. लावणी, लेझीम, धनगरी गजा, गोंधळ, कोळी नृत्य आणि पोवाडा यांसारख्या लोककलेचा धड्यात समावेश करता आला असता. तसेच राज्यातील विविध विभागांतील लोकनृत्यांनाही स्थान देण्याची संधी होती.
या पार्श्वभूमीवर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून पाठ्यपुस्तकात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि बालभारती यांनी या निवडीबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीही इयत्ता तिसरीच्या पुस्तकात भिडेवाड्याचा उल्लेख "महाराष्ट्रातील पहिली शाळा" असा करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. इतिहासानुसार भिडेवाडा हा देशातील पहिला मुलींचा शाळा प्रकल्प असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर बालभारतीने संबंधित मजकुरात दुरुस्ती करण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, सध्या चर्चेत असलेल्या 'लोकनृत्य' धड्यात महाराष्ट्रातील वारकरी दिंडी व्यतिरिक्त पंजाबचा भांगडा, गुजरातचा रास, बिहारमधील आदिवासी लोकनृत्य आणि छत्तीसगडमधील बस्तर लोकनृत्य यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक पारंपरिक लोकनृत्यांना स्थान न देता इतर राज्यांतील नृत्यांचा अधिक समावेश केल्याने हा मुद्दा आता चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे.




