पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला देत मंगेश चिवटेंना उमेदवारी द्यावी; फडणवीस-शिंदेंकडे साकडे घालणार
पुणे (प्रतिनिधी) : पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला सोडून मंगेश चिवटे यांना उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे घालणार असल्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सुहास बाबर यांनी दिली. मिरज येथे शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करत हजारो गरजू रुग्णांना मदतीचा हात देणारे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना पुणे शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर संधी मिळावी, यासाठी शिवसेनेचे आमदार आणि शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी एकत्रितपणे वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मिरज येथे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षक आणि आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
“शिक्षक, शिक्षण संस्था आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्यासारख्या जनसेवकाचा आवाज विधान परिषदेत पोहोचणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रासह सामाजिक कार्यात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. गोरगरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यापासून शिक्षक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्यापर्यंत त्यांचा जनसेवेचा प्रवास महत्त्वाचा आहे,” अशी भावना आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केली.
मंगेश चिवटे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन पुणे शिक्षक मतदारसंघातून त्यांना संधी मिळावी, यासाठी शिवसेनेचे आमदार आणि शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
शिक्षक, शिक्षण संस्था आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावी आवाज मिळावा, तसेच आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचा अनुभव विधिमंडळात उपयोगी पडावा, यासाठी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे आमदार आणि शिक्षक बांधव एकवटत असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.




