तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला भुजबळांचा पाठिंबा

तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला भुजबळांचा पाठिंबा

सातारा (प्रतिनिधी): अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी विभागातील कारवायांचा वेग वाढवला आहे. गेल्या महिनाभरात विभागाने केलेल्या विविध कारवायांची माहिती त्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात अधिक कठोर भूमिका घेत उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांवरही मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुंढे यांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, “तुकाराम मुंढे धाडसी पावले उचलत असतील तर ती निश्चितच स्वागतार्ह आहेत. अन्नपदार्थ, दूध आणि औषधांमधील भेसळीचा प्रश्न गंभीर आहे. मी स्वतः त्यांना फोन करून दुधातील भेसळ आणि त्यातून होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.”

भेसळयुक्त अन्नधान्य आणि बनावट औषधांच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. “गरज पडल्यास अशा गुन्हेगारांवर मोक्का लावण्यासही मागे-पुढे पाहू नये,” असे त्यांनी सांगितले.