विलास घुले हत्याकांडाला नवे वळण! फडणवीसांचा लक्ष्मण हाकेंना फोन, खासदार पुत्राच्या चौकशीची मागणी
बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील युवक विलास घुले यांच्या हत्येप्रकरणी राजकीय आणि सामाजिक घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. मंगळवारी तब्बल नऊ तास विलास घुले यांचा मृतदेह केज पोलीस ठाण्यासमोर ठेवून ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून आंदोलनाची आणि प्रकरणाची माहिती घेतल्याचे हाके यांनी सांगितले. आंदोलकांच्या भावना आणि मागण्या यावेळी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. विलास घुले हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींना अटक करण्यात यावी आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.
आंदोलकांकडून खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्याविरोधातही कारवाईची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात पुरवणी जबाब नोंदवण्यात आला असून चौकशीअंती पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली.पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सर्व बाजूंनी निष्पक्ष तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. रात्री उशिरा विलास घुले यांच्या पार्थिवावर टाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, या हत्येने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून आतापर्यंत नऊ आरोपींपैकी सहा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणातील प्रत्येक पैलूची कसून चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




