महापौर रितू तावडेंच्या ‘झारीतले शुक्राचार्य’ वक्तव्यावर भाजपमध्ये नाराजी; कोअर कमिटी बैठकीत जाब?

महापौर रितू तावडेंच्या ‘झारीतले शुक्राचार्य’ वक्तव्यावर भाजपमध्ये नाराजी; कोअर कमिटी बैठकीत जाब?

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौरपदावर विराजमान झाल्यापासून वाद आणि आरोपांमुळे चर्चेत असलेल्या रितू तावडे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. रितू तावडे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यातील अंतर्गत धुसफूस नुकतीच चव्हाट्यावर आली होती. यासंदर्भात बोलताना रितू तावडे यांनी अप्रत्यक्षपणे राजेश्री शिरवडकर यांचा उल्लेख ‘झारीतले शुक्राचार्य’ असा केला होता. आता रितू तावडे यांचे हेच वक्तव्य त्यांना भोवणार की काय, अशी चर्चा भाजपच्या अंतर्गत वर्तुळात सुरू झाली आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या वक्तव्याबाबत मुंबई भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिकेत पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर चर्चा करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी महापौरांच्या कामांबाबत मुंबई अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केल्याचे समजते.

महापौर विविध कारणांमुळे वादात सापडत असल्याने अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच महापौरांनी ‘झारीतले शुक्राचार्य’ असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे पक्षातील काही जणांवर टीका केली. त्यामुळे या वक्तव्याबाबतही महापौरांना जाब विचारण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

गेल्या अनेक दिवसांपासून महापौर कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात आहेत. या सर्व कारणांबाबत महापौरांना बैठकीत विचारणा करण्यात आल्याची माहिती आहे. याच बैठकीत मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासमोर महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नगरसेवकांच्या एकत्रित बैठकीपूर्वी भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यासोबत बैठक घेतली. सभागृह नेत्यांकडेही अंतर्गत वादाबाबत अमित साटम यांनी विचारणा केली. तसेच सदस्यांमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव यामागची कारणेही जाणून घेण्यात आली.

मुंबई महापालिकेतील ज्यांचा वाद आहे, त्यांनीच तो सोडवावा, अशी भूमिका मुंबई महापालिकेतील वादावर भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. महापौर, शिक्षण समिती सभापती, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्षांवर समन्वय राखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अंतर्गत वादात पक्षाला गृहीत धरू नका, असे स्पष्ट निर्देशही अमित साटम यांनी दिल्याचे समजते.

नगरसेवकांच्या कामांवर फंड आणि इतर बाबी ठरतील. पालिकेच्या माध्यमातून झालेले चांगले निर्णय मुंबईकरांपर्यंत पोहोचवा, असेही अमित साटम यांनी सांगितल्याची माहिती आहे. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर या दोघींनाही अमित साटम यांनी योग्य ती समज दिल्याची माहिती आहे. महापालिकेत एकमेकांशी स्पर्धा न करता समन्वयाने काम करण्याच्या सूचना साटम यांनी दिल्या आहेत.