NEET परीक्षा : अहिल्यानगरमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट जप्त

NEET परीक्षा : अहिल्यानगरमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट जप्त

मुंबई :हिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. 'नीट' (NEET) पुनर्परीक्षेतील कमी गुणांमुळे आलेल्या नैराश्यातून १९ वर्षीय अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता घरूनच ऑनलाईन कोचिंगद्वारे नीट परीक्षेची तयारी करत होती. शनिवारी (२८ जुलै) तिचे आई-वडील आणि मोठा भाऊ आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेले होते. सायंकाळी ५:३० च्या सुमारास नातेवाईक घरी आले असता, अंकिता सिलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळली.

कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे.

सुसाईड नोटमधील मजकूर:

"मी एक सामान्य विद्यार्थिनी आहे. नीट पुनर्परीक्षेत मला अपेक्षित गुण मिळवता आले नाहीत आणि मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही," असे लिहीत अंकिताने तिचे आई-वडील आणि भावाची माफी मागितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कटऑफ १७७ गुणांचा असताना अंकिताला १६६ गुण मिळाले होते. या अपयशाच्या निराशेतूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जत पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

या दुःखद घटनेवर शोक व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

·         "नीट परीक्षेतील अनागोंदी आणि हेराफेरीमुळे अंकिताने आपला आत्मविश्वास गमावला आणि आयुष्य संपवले." त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, "कोणत्याही अपयशाने खचून जाऊ नका. आपल्या कुटुंबाचा विचार करा आणि कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा, कारण संघर्षाला कोणताही पर्याय नाही."

नीट परीक्षेचा वाढता तणाव

NEET परीक्षेतील गोंधळ आणि तणावामुळे घडलेली ही पहिलीच घटना नाही. काही आठवड्यांपूर्वीच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजी येथील २१ वर्षीय यश गोसावी या विद्यार्थ्याने पुनर्परीक्षेच्या एक दिवस आधी आत्महत्या केली होती. पेपरफुटीची बातमी येण्यापूर्वी यशला एमबीबीएसची (MBBS) जागा मिळण्याचा पूर्ण विश्वास होता, परंतु अचानक जाहीर झालेल्या पुनर्परीक्षेच्या निर्णयामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली आला होता.

देशभरात नीट परीक्षेतील अनियमितता आणि तणावामुळे काही विद्यार्थ्यांनी टोकाची पावले उचलली आहेत. या गोंधळामुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून विद्यार्थी आणि विविध संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.