एकनाथ शिंदेंचा स्मितहास्याचा फोटो अन् 'मोठे गार केले गंमतमध्ये;उदय सामंतांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा
मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून आज नवी दिल्लीत संसदीय दलाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता होणारी ही बैठक खासदारांच्या निष्ठेची कसोटी मानली जात आहे. पक्षाने सर्व खासदारांना व्हीप जारी केला असून बैठकीला किती आणि कोणते खासदार उपस्थित राहतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची जोरदार चर्चा रंगली आहे. सामंत यांनी स्टेटसमध्ये एकनाथ शिंदे यांचा हसरा फोटो ठेवत 'मोठे मोठे गार केले गंमतमध्ये.' हा लोकप्रिय डायलॉग वापरला आहे. त्यामुळे 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांमध्ये या स्टेटसने आणखी रंग भरल्याचे पाहायला मिळत आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की, "एकनाथ शिंदे ज्या मोहिमेचा पुढाकार घेतात, ती यशस्वीच होते. त्यांनी हाती घेतलेल्या अनेक राजकीय रणनीती यापूर्वीही यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळेच काही जणांनी ऑपरेशन यशस्वी होणार नाही असे म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर मी हे स्टेटस ठेवले."
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या सहा खासदारांशी काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी कॉन्फरन्स कॉलद्वारे सविस्तर चर्चा केली. जवळपास 30 मिनिटे चाललेल्या या चर्चेत काही संभ्रमात असल्याचे सांगितले जाणारे खासदारही सहभागी असल्याचे बोलले जात आहे. यावेळी शिंदे यांनी सर्व खासदारांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा राहील, असे आश्वासन दिल्याची माहिती आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या आजच्या संसदीय बैठकीला काही खासदार गैरहजर राहू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमध्ये समन्वयाची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर नेमकी कोणती राजकीय समीकरणे पुढे येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




