डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; पती डॉ. नीलेश जेजुरकर पाठोपाठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्वाती चव्हाण यांना अटक

डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; पती डॉ. नीलेश जेजुरकर पाठोपाठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्वाती चव्हाण यांना अटक

नाशिक : राज्याला हादरवून सोडणाऱ्या प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा नीलेश जेजुरकर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तपासात अत्यंत खळबळजनक वळण आलेले आहे. या प्रकरणी आधीच पती डॉ. नीलेश जेजुरकर यांना अटक करण्यात आली होती, आता नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या दोन हायप्रोफाइल डॉक्टरांच्या अटकेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

नेमकी घटना आणि पार्श्वभूमी
६ मार्च रोजी नाशिकच्या गंगापूर रोडवरील डी. के. नगर भागातील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये ४० वर्षीय डॉ. मनीषा जेजुरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी डॉ. मनीषा यांची बहीण रोहिणी वैभव थोरात यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मृत डॉ. मनीषा यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार, पती डॉ. नीलेश जेजुरकर यांचे सिव्हिल हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागप्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांच्याशी अनैतिक संबंध होते. डॉ. नीलेश हे २०२१ पासून सहकारी महिला डॉक्टरच्या सल्ल्याने वागत पत्नीकडे दुर्लक्ष करत होते. तसेच, जानेवारी महिन्यात डॉ. स्वाती चव्हाण यांनी डॉ. मनीषा यांना फोन करून "तुझ्या बुद्धीची पातळी कमी आहे, तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाहीस," असे म्हणत मानसिक छळ केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. नीलेश जेजुरकर यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, १७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने डॉ. नीलेश यांना ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्यांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात डॉ. स्वाती चव्हाण यांनाही अटक झाल्यामुळे तपासाची व्याप्ती वाढली असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.