सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर ठाकरे गटात खळबळ; सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य

सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर ठाकरे गटात खळबळ; सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतल्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे. वरळीतील प्रभावी नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटातील आणखी काही आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, सचिन अहिर यांनी त्यांना फोन केला होता, मात्र प्रत्यक्ष भेट झाली नाही. त्यामुळे त्यांनी नेमकं काय सांगायचं होतं, याबाबत त्या कोणताही दावा करू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अंधारे म्हणाल्या की, त्या संपूर्ण दिवस 'मातोश्री'वर होत्या आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होत्या. पुण्यातील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठकही सेनाभवनात पार पडल्याचं त्यांनी सांगितलं.पक्षातील घडामोडींवर बोलताना अंधारेंनी म्हटलं, "इतके विश्वासू सहकारी पक्ष सोडून जात असल्यामुळे आता सावलीवरही संशय घ्यावा लागतो. त्यामुळे कोणाबद्दलही चर्चा होणं स्वाभाविक आहे."

आणखी काही आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांवर त्या म्हणाल्या की, नेमकं काय सुरू आहे हे संबंधित आमदारांनाच माहिती आहे. मात्र, दोन तासांपूर्वी विश्वासू वाटणारा नेता अचानक पक्ष सोडतो, यामागची कारणं शोधण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.

याचबरोबर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत अंधारे म्हणाल्या की, पक्षाने ज्यांना मोठं केलं, त्याच नेत्यांनी आपली राजकीय ताकद वापरून वेगळा मार्ग स्वीकारला. पण ज्यांना कधीच काही मिळालं नाही, तो सामान्य शिवसैनिक आजही पक्षासोबत ठामपणे उभा आहे. त्यामुळे आता नव्या आणि निष्ठावान शिवसैनिकांना संधी देण्याची वेळ आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.