रोहित पवारांचा दावा: अजितदादांवर खालच्या पातळीचा ऑडिओ; अमोल मिटकरींचा इशारा

रोहित पवारांचा दावा: अजितदादांवर खालच्या पातळीचा ऑडिओ; अमोल मिटकरींचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला होता. राष्ट्रवादीतील दोन बडे नेते अजित पवार यांच्याविषयी अत्यंत खालच्या भाषेत बोलतानाची एक ऑडिओ क्लीप समोर आली आहे, असे त्यांनी म्हटले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, "अजितदादांविषयी खालच्या पातळीवर बोलणारा कितीही मोठा असला, तरी त्याला सोडणार नाही, त्याला व्याजासहित उत्तर देऊ," असा थेट इशारा दिला आहे.

आमदार रोहित पवार यांनी एबीपी माझाच्या 'कॉफी विथ कौशिक' या कार्यक्रमात राष्ट्रवादीत खळबळ उडवून देणारा दावा केला होता. रोहित पवार म्हणाले होते की, "राष्ट्रवादीतील दोन बडे नेते अजित पवार यांच्याविषयी अत्यंत खालच्या भाषेत बोलत असल्याची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ही क्लीप सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ऐकली आहे. हे दोघे अजित पवारांविषयी काय बोलले हे सुनेत्रा वहिनींना माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवायच्या आधी राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने  सुनेत्रा पवार यांना ही ऑडिओ क्लीप ऐकली होती, असा दावा रोहित पवार यांनी केला होता.  

रोहित पवारांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना अमोल मिटकरी यांनी सुरुवातीला हा दावा फेटाळण्याचा प्रयत्न केला."सध्या विविध चर्चांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या 'ऑडिओ क्लिप'च्या चर्चेत कोणतेही तथ्य असेल असं वाटत नाही," असे मिटकरी म्हणाले. परंतु, पुढे बोलताना त्यांनी कडक शब्दांत इशारा दिला की, जर 'ऑडिओ क्लिप'ची चर्चा खरी असली तर अजितदादांवर खालच्या पातळीवर बोलणाऱ्याला सोडणार नाही. बोलणारा कितीही मोठा नेता असला तरी त्याला सोडणार नाही, त्याला व्याजासहित उत्तर देऊ, असा इशारा माजी आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.