विद्यानंद बापट हल्ला प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘बापटांचा मुद्दा योग्य, हल्ला म्हणजे लोकशाहीवरच हल्ला’

विद्यानंद बापट हल्ला प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘बापटांचा मुद्दा योग्य, हल्ला म्हणजे लोकशाहीवरच हल्ला’

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यात गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करत डीजेवर बंदी घालण्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रस्त्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर अवघ्या तीन तासांत पुणे क्राईम ब्रँचने आरोपी संतोष चव्हाण याला अटक केली. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विद्यानंद बापट यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचे समर्थन करत शरद पवार यांनी त्यांच्या हल्ल्याचा निषेध केला. एखाद्या व्यक्तीने आपले मत व्यक्त केल्यामुळे त्याच्यावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीवरच हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले, “सण हा सुखद आणि लोकांना आनंद देणारा असला पाहिजे. डीजेचे आवाज आणि त्यावर रस्त्यांवरील कार्यक्रम यामुळे सणाचे गांभीर्य कमी होत जाते. विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही. परंतु, त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे.गणेशोत्सवाची परंपरा आहे. मात्र, उत्सवातील चुकीच्या गोष्टीवर बापट मत व्यक्त करत आहेत. त्यांच्या भूमिकेला माझं समर्थन आहे. कोणीतरी या संदर्भात मत व्यक्त केलं म्हणून त्यांच्यावर हल्ला करणं हा लोकशाहीवर हल्ला आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त आणि इतर संबंधित घटकांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. बापटांच्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्यांच्या मी सोबत आहे. हल्ले थांबायला पाहिजेत, नाहीतर सक्तीचे धोरण स्वीकारले पाहिजे. सोलापूरने डीजेबाबत निर्णय घेतला, असे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “या गलिच्छ कृतीचा मी जाहीर निषेध करते. माझं विद्यानंद बापट यांच्याशी सविस्तर बोलणं झालं आहे. मी स्वतः माझ्या ओळखीतले वकील त्यांच्या मदतीला तातडीने पाठवत आहे. ही गलिच्छ प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की, सातत्याने यात पुण्याची बदनामी होत आहे. राज्याची देखील बदनामी होत आहे. या गलिच्छ प्रवृत्तीच्या मागे कुठली अदृश्य शक्ती आहे?

एखादी व्यक्ती जर आपले मत मांडत असेल, तर तुम्ही त्याला येऊन मारहाण करणार का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मी याचा जाहीर निषेध करते. माणुसकीच्या नात्याने आम्ही बापटांच्या मागे ताकदीने उभे राहणार,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.