ओमराजे निंबाळकर दिल्लीत दाखल झाल्याच्या चर्चांना उधाण; ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत
पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी पुन्हा वेग घेतला असून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीत पोहोचल्याच्या चर्चांना जोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीनंतर पुण्यातून एका खाजगी विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर विशेष तयारी करण्यात आली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने दोन खाजगी विमाने उपलब्ध ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सूत्रांच्या दाव्यानुसार, दिल्ली प्रवासाचा कार्यक्रम दिवसभरात अनेकदा बदलण्यात आला. सुरुवातीला दुपारी ३ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता, पुढे रात्री ९ वाजता आणि अखेरीस रात्री १ वाजता उड्डाण झाल्याचे सांगितले जात आहे.या प्रवासात महायुतीचे नेते व माजी मंत्री तानाजी सावंत तसेच जय राजे निंबाळकर हेही उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना आणखी बळ मिळाले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ओमराजे निंबाळकर पुण्यात असल्याचे सांगितले जात होते. त्यांनी माध्यमांपासून काहीसे अंतर राखल्याने त्यांच्या हालचालींबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. एबीपी माझाशी संवाद साधताना आपण पुण्यात असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे ते प्रत्यक्षात पुण्यात होते की दिल्लीत, याबाबत संभ्रम कायम आहे.
धाराशिवमधील गोवर्धनवाडी येथील त्यांच्या निवासस्थानीही विशेष हालचाल दिसून आली नसल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. कुटुंबीयांसह ते पुण्यात असल्याची माहितीही समोर आली आहे.राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही खासदार पक्षांतराच्या तयारीत असल्याचे दावे राजकीय वर्तुळात केले जात आहेत. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.




