मंत्री जयकुमार गोरेंविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी संजय राऊतांवर सोलापुरात गुन्हा दाखल; भाजप कार्यकर्ते रस्त्यावर!

मंत्री जयकुमार गोरेंविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी संजय राऊतांवर सोलापुरात गुन्हा दाखल; भाजप कार्यकर्ते रस्त्यावर!

सोलापूर: शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात वादग्रस्त अन् अवमानकारक भाषेचा वापर केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे सोलापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

BNS च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना संजय राऊतांनी शिवराळ भाषेचा वापर केला होता. याविरोधात नगरसेवक मनीष केत यांच्या फिर्यादीवरून संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३५६(२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर गावात भाजप नेते राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांचे पुत्र अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संजय राऊत यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून त्याचे दहन केले व जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

वाद नेमका कशामुळे पेटला?

देहू येथे भाजप कार्यालयाचे उद्घाटन करताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला होता. "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आता कोणतेही अस्तित्व उरलेले नाही, ते आपले अस्तित्व शोधत आहेत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील," असा खोचक टोला गोरे यांनी लगावला होता.

जयकुमार गोरे यांच्या याच टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांची जीभ घसरली आणि त्यांनी अत्यंत कठोर व अवमानकारक शब्दांत पलटवार केला. त्यामुळे आता सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि ठाकरे गटातील राजकीय वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.