बृजभूषण सिंह निर्दोष मुक्त; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या लढा सुरूच राहणार

बृजभूषण सिंह निर्दोष मुक्त; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या लढा सुरूच राहणार

मुंबई (प्रतिनिधी) : महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर बृजभूषण सिंह यांच्या समर्थकांनी जल्लोष केला, तर कुस्तीपटू आणि काँग्रेस आमदार विनेश फोगाट यांनीही आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

विनेश फोगाट म्हणाल्या, एका शक्तिशाली राजकीय व्यक्तीविरोधात रस्त्यावर उतरून एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला मोठे धैर्य दाखवावे लागले. राजकीय ताकद आणि दबाव असूनही अनेक महिला कुस्तीपटूंनी आपला लढा सुरू ठेवला.

न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत विनेश फोगाट म्हणाल्या की, या निकालामुळे आम्हाला दुःख झाले आहे. सुरुवातीपासूनच संपूर्ण व्यवस्था आणि यंत्रणा बृजभूषण सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, या निर्णयाविरोधात अपील करण्याची तयारी सुरू असून, कुस्तीपटूंचा संघर्ष कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, निर्दोष मुक्ततेनंतर बृजभूषण शरण सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आरोप झाल्यापासून मी सांगत होतो की, जर कोणताही आरोप सिद्ध झाला तर मी शिक्षा स्वीकारेन. आज न्यायालयाने माझी सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. हा माझ्यासाठी आणि माझ्या समर्थकांसाठी आनंदाचा दिवस आहे.

या प्रकरणात 2016 ते 2019 दरम्यान कुस्ती महासंघाचे कार्यालय, अधिकृत निवासस्थान आणि परदेश दौऱ्यांमध्ये महिला कुस्तीपटूंचा छळ केल्याचे आरोप करण्यात आले होते. 2023 मध्ये विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन केले होते.

यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात बृजभूषण शरण सिंह यांच्यासह WFI चे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनाही आरोपी करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने पुराव्यांच्या अभावामुळे दोघांचीही निर्दोष मुक्तता केली आहे.